असा झाला खासगी अवकाश संशोधन क्षेत्राचा भारतातील प्रवास
१८ जुलै २०२६ या दिवसाची नोंद भारताच्या विज्ञान क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णक्षणांनी झाली आहे. १८ जुलै २०२६ रोजी स्कायरूट एअरोस्पेस या खासगी स्टार्ट अपने विक्रम-१ या रॉकेटचे यशस्वी कक्षीय प्रक्षेपण केले. या प्रक्षेपणामुळे भारतीय भूमीवरून कक्षेत उपग्रह पाठवणारी स्कायरूट एअरोस्पेस ही पहिली खासगी भारतीय कंपनी ठरली. एका पडलेल्या चर्चमधून आपण दिवाळीत उडवतो त्याचेच मोठे स्वरूप वाटावे अशा प्रकारचे रॉकेट उडवत, प्रसंगी सायकलला एखाद्या गरीब माणसाने आपले सामान बांधून सामानाची ने-आण करावी, त्या पद्धतीने अवकाश संशोधनाच्या श्रीगणेशा करणाऱ्या एका देशाने पाश्चात्त्य देशांच्या बरोबरीने येत, त्यांच्या देशात घडल्यावर काहीच महिन्यांच्या आत केलेला तो भीम पराक्रम होता.
या भीम पराक्रमाची गोष्ट सुरू होते इस्रोच्या स्थापनेपासून. इस्रो भारताची जगात अभिनंदनास्पद वाटावी अशी ओळख. एका अशा देशाची अवकाश संशोधन संस्था, ज्या देशाला १५० वर्षांच्या गुलामीनंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. देशाला स्वातंत्र्य तर मिळाले आहे, मात्र ते फाळणीच्या जखमा घेऊन. देशात भूकमारी, नसलेले औद्योगिकीकरण तसेच असंख्य भाषिक, प्रादेशिक अस्मितेचे विविध प्रश्न नव्या देशाच्या प्रगतीला रोखण्यासाठी टपलेलेच आहेत, अशी स्थिती. त्यात भरीस भर म्हणून सभोवताली असणारी शत्रूराष्ट्रे. या सारख्या अडचणीच्या काळात स्वातंत्र्यानंतर फक्त १० वर्षांत, त्यावेळी जगातील अमेरिका आणि सोव्हिएत सोशलिस्ट रशिया या दोन महासत्तांनाच काही प्रमाणात साध्य झालेल्या अवकाश संशोधन क्षेत्रात पाऊल टाकत भारताने उभारलेली संस्था. एप्रिल १९७५ मध्ये भारताने यु एस एस आर च्या मदतीने का होईना, स्वतःचा उपग्रह अवकाशात सोडला. पुढे त्याच्याच मदतीने स्वतःचा अंतराळवीर देखील अवकाशात पाठवला. कॅनडाने आपण केलेल्या आण्विक चाचणीचे कारण देत आपल्या भारताला अत्याधुनिक क्रायोजेनिक इंजिनाचे तंत्रज्ञान देण्याचे नाकारल्यावर खचून न जाता, स्वतःच्या हिमतीवर ते तंत्रज्ञान विकसित करत, त्याच्या मदतीने स्वतःचे आणि इतर अनेक देशांचे उपग्रह अवकाशात सोडण्याची किमया, ती देखील एकाच वेळी आश्चर्य वाटेल इतक्यासंख्येने, ते देखील वेगवेगळ्या उंचीवर प्रक्षेपित करण्याच्या अशक्यप्राय पराक्रमासह, चंद्राचा ज्या भागावर अजून कोणीच गेले नाहीये अशा दक्षिण ध्रुवावर पहिल्याच प्रयत्नात, ते देखील एका हॉलिवूड चित्रपट तयार करण्यासाठी लागणाऱ्या बजेटपेक्षा कमी खर्चात उतरवणारी, चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावणारी संस्था म्हणजे इस्रो. नासा आणि इतर संस्था व्यावसायिक रणनीतीचा अवलंब करत त्यानुसार धोरणे आखत असताना, देशातील परिस्थितीचाच विचार करत कायम देशहिताचा विचार करत त्यानुसार अवकाश संशोधन करणारी संस्था, ते देखील वाटाण्याच्या अक्षता म्हणता येतील इतक्या तुटपुंज्या बजेटमध्ये काम करणारी संस्था म्हणजे इस्रो
जगात होणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील बदलाचा आपल्या प्रत्येकावर परिणाम होतोच, तसा इस्रोवर देखील झाला. जगात सर्वच ठिकाणी पाहिल्यांदा सरकारी पातळीवर सुरू झालेल्या अवकाश संशोधन प्रकल्पात खासगी क्षेत्राचा देखील शिरकाव झाला. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल वन सारख्या मोहिमेचे आखणी करणाऱ्या इस्रोवर देखील तो पडलाच. अमेरिकेत एलन मस्क यांनी स्पेस एक्स ही खासगी अंतराळ संशोधन संस्था स्थापन केल्यावर भारताने देखील हे क्षेत्र खासगी उद्योजकांसाठी पूर्णतः खुले करावे, अशी मागणी जोर धरू लागली. तसेही इस्रो तिच्या कामासाठी अनेक खासगी कंपन्यांची मदत घेतच होता; मात्र हा आधार फक्त वस्तू निर्मितीसाठी साहाय्य घेण्यापर्यंतच मर्यादित होता. खासगी कंपन्यांनी एकदा वस्तू तयार केल्यावर त्यावर पूर्णतः इस्रोची मालकी असे. तसेच या संस्थांना इसरोला डावलून स्वतःची अवकाश संशोधन कंपनी स्थापन करता येत नव्हती. मात्र स्पेस एक्सच्या यशानंतर हे क्षेत्र पूर्णतः खुले करावे, या मागणीने जोर धरला. अखेर टप्प्याटप्प्याने पुढील गोष्टी करत भारत सरकारने अवकाश क्षेत्र सुद्धा खासगी क्षेत्रासाठी खुले केले.
ज्याची जून 2020 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने अंतराळ क्षेत्रातील सुधारणांना मंजुरी दिल्याने झाली. या मंजुरीमुळेभारतीय खासगी कंपन्यांना अंतराळ क्षेत्रातील end-to-end activities मध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला. सरकारचा दृष्टिकोन “supply-based model” वरून “demand-based model” कडे वळवला गेला. यानंतरचा दुसरा टप्पा IN-SPACe ची स्थापनाची स्थापना झाल्याने गाठला गेला. खासगी कंपन्यांना परवानगी, मार्गदर्शन आणि सुविधा देण्यासाठी Indian National Space Promotion and Authorisation Centre (IN-SPACe) ही स्वतंत्र, एक खिडकी (single-window) संस्था निर्माण करण्यात आली. ती खासगी कंपन्यांच्या अंतराळ उपक्रमांना प्रोत्साहन, अधिकृत मान्यता आणि देखरेख करते. तिसऱ्या टप्प्यात इसरो आणि खासगी क्षेत्रात भागीदारी करण्याच्या दृष्टीने खासगी कंपन्यांना ISROच्या प्रयोगशाळा, चाचणी सुविधा, तांत्रिक कौशल्य आणि काही पायाभूत सुविधांचा वापर करण्याची संधी देण्यात आली. ISROकडील तंत्रज्ञान खासगी उद्योगांना हस्तांतरित करण्याची प्रक्रियाही सुरू झाली. Indian Space Policy 2023 हा या सुधारणांमधील चौथा आणि महत्त्वाचा पुढचा टप्पा होता. या धोरणाने खासगी कंपन्यांना उपग्रह, प्रक्षेपण वाहने, अंतराळ-आधारित सेवा आणि ग्राउंड-आधारित पायाभूत सुविधा अशा संपूर्ण Space Economy मध्ये सहभागी होण्यासाठी अधिक स्पष्ट धोरणात्मक चौकट दिली. पाचव्या टप्प्याने खासगी कंपन्यांना प्रत्यक्ष प्रक्षेपण आणि उपग्रह क्षेत्रात प्रवेश मिळाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याच टप्प्यात खासगी कंपन्यांना उपग्रह तयार करणे, प्रक्षेपण वाहने विकसित करणे, उपग्रह प्रक्षेपित करणे, ग्राउंड स्टेशन उभारणे आणि अंतराळ-आधारित सेवा देणे यांसारख्या क्षेत्रांत काम करण्यासाठी IN-SPACeमार्फत अधिकृतता मिळू लागली. 2022 पासून खासगी संस्थांना विविध प्रकारच्या अंतराळ उपक्रमांसाठी अधिकृतता देण्यात आली. फेब्रुवारी 2024 मध्ये सरकारने अंतराळ क्षेत्रातील FDI धोरण उदार केले. ज्याला आपण आतापर्यंतच्या वाटचालीतील शेवटचा टप्पा म्हणू शकतो. या टप्प्यामुळे पुढील महत्त्वाचे बदल झाले.
उपग्रह निर्मिती व संचालन, satellite data products आणि ground/user segment मध्ये 74% पर्यंत Automatic Route
Launch Vehicles आणि Spaceports मध्ये 49% पर्यंत Automatic Route
उपग्रह, ground segment आणि user segment साठी components/systems निर्मितीत 100% FDI Automatic Route
अशी व्यवस्था करण्यात आली.
IN-SPACe मार्फत Seed Fund, Mentorship, Pricing Support, Skill Development, Design Lab, Technical Centre, ISRO Facility Utilisation Support आणि Technology Transfer यांसारख्या योजना सुरू करण्यात आल्या. या बदलामुळे भारतात स्पेस इकॉनॉमी या नवीन क्षेत्राचा उदय झाला.
आज जगात भारताची एक नवीन अभिनंदनास्पद ओळख या इकोनॉमीमुळे निर्माण झाली आहे. खासगी क्षेत्राचा अवकाश संशोधन क्षेत्रासारख्या अत्यंत खर्चिक म्हणता येईल अशा क्षेत्रात प्रवेश झाल्याने अवकाश संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या संस्था आपले ज्ञान, कौशल्य परदेशी संस्थांना विकून, इसरो ज्या प्रमाणे उपग्रह प्रक्षेपणातून परकीय चलन देते, त्या प्रमाणे भारताला परकीय चलन देखील मिळवून देऊ शकतात. तसेच यामुळे संशोधनाचा वेग देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. आतापर्यंत भारताला भेडसावणाऱ्या ब्रेन ड्रेन या समस्येला देखील एक प्रकारे अटकाव घालता येईल. या सकारात्मक बदलांसह खासगी कंपन्या शास्त्रज्ञांना अधिक वेतन देऊ शकत असल्याने इसरोतील शास्त्रज्ञ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाऊ शकतील, किंबहुना आतापासूनच जात आहेत. या शिवाय या कंपन्या व्यावसायिक हिताचा विचार करत काम करत असल्याने प्राथमिक संशोधनाचे काम कितपत करतील, याबाबत मोठी शंका घेण्यास वाव आहे. अशा वेळी मूलभूत संशोधनासारखी खर्चिक मात्र फारसा नफ्याची शक्यता नसलेली कामे फक्त इसरोला करावी लागू शकतात. मात्र नकारात्मक मुद्दे विचारात घेत याला विरोध करणे तितकेच चुकीचे देखील आहे, हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे.
आज हा मजकूर तुम्ही वाचत असताना आपल्या भारतात सुमारे450 या प्रकारचे स्टार्टअप आहेत. या प्रत्येकाची कहाणीही मोठी अभिमानास्पद आहे. त्या प्रत्येकाविषयी अगदी थोडक्यात सांगायचे झाले तरी स्वतंत्र पुस्तक काढावे लागेल. मात्र ते मला तरी अशक्य असल्याने या 450 स्टार्टअपपैकी महत्त्वाच्या अशा 4 स्टार्टअपची माहिती देत मी आपली रजा घेतो.
1 स्कायरूट एअरोस्पेस
हैदराबादस्थित स्कायरूट एअरोस्पेस ही भारतातील आघाडीची खासगी अंतराळ तंत्रज्ञान कंपनी आहे. 2018 मध्ये माजी इस्रो शास्त्रज्ञ पवन कुमार चंदना आणि भरत डाक्का यांनी या कंपनीची स्थापना केली. कमी खर्चात आणि गरजेनुसार उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी रॉकेट विकसित करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. विक्रम-एस या रॉकेटचे २०२२ मध्ये यशस्वी प्रक्षेपण करून कंपनीने इतिहास घडवला. त्यानंतर 18 जुलै 2026 रोजी विक्रम-1 या रॉकेटचे यशस्वी कक्षीय प्रक्षेपण केले. भारतीय भूमीवरून कक्षेत उपग्रह पाठवणारी ती पहिली खासगी भारतीय कंपनी ठरली.
2.अग्निकुल कॉसमॉस
चेन्नईस्थित अग्निकुल कॉसमॉस या कंपनीची स्थापना 2017 मध्ये आयआयटी मद्रासमधील संशोधकांनी केली. श्रीनाथ रविचंद्रन आणि मोइन एसपी हे कंपनीचे सहसंस्थापक आहेत. लहान उपग्रहांचे प्रक्षेपण कमी खर्चात आणि ग्राहकांच्या गरजेनुसार करण्यासाठी कंपनी अग्निबाण हे रॉकेट विकसित करत आहे. या रॉकेटमध्ये एकाच तुकड्यात तयार केलेल्या थ्रीडी प्रिंटेड इंजिनचा वापर हे वैशिष्ट्य आहे. 30 मे 2024 रोजी अग्निबाण SOrTeD या प्रायोगिक रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले. भारतातील पहिल्या खासगी प्रक्षेपण तळावरून झालेले हे उड्डाण भारतीय खासगी अंतराळ क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरले.
३. पिक्सेल
बेंगळुरूस्थित पिक्सेल ही पृथ्वी निरीक्षण आणि उपग्रह माहिती विश्लेषण क्षेत्रातील भारतीय स्टार्टअप कंपनी आहे. 2019 मध्ये अवैस अहमद आणि क्षितिज खंडेलवाल यांनी या कंपनीची स्थापना केली. पृथ्वीवरील पर्यावरणीय बदल, शेती, खाणकाम, ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनांचे निरीक्षण करण्यासाठी कंपनी हायपरस्पेक्ट्रल तंत्रज्ञानाचा वापर करते. या तंत्रज्ञानामुळे सामान्य उपग्रह प्रतिमांमध्ये सहज न दिसणारे बदलही ओळखता येतात. पिक्सेलने फायरफ्लाय ही सहा उपग्रहांची व्यावसायिक मालिका विकसित केली आहे. उपग्रहांकडून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून विविध उद्योग आणि शासन संस्थांना निर्णय घेण्यासाठी उपयुक्त माहिती पुरवणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.
4 ध्रुव स्पेस
हैदराबादस्थित ध्रुव स्पेस ही भारतीय अंतराळ अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वाची स्टार्टअप कंपनी आहे. संजय नेकांती यांनी 2012 मध्ये या कंपनीची स्थापना केली. उपग्रहांची निर्मिती, त्यासाठी आवश्यक यंत्रणा, सौर पॅनेल, ग्राउंड स्टेशन आणि प्रक्षेपणाशी संबंधित सेवा अशा विविध क्षेत्रांत कंपनी कार्यरत आहे. लहान आकाराच्या उपग्रहांसाठी पी-डॉट आणि पी-३० यांसारखे उपग्रह प्लॅटफॉर्म कंपनीने विकसित केले आहेत. पृथ्वी निरीक्षण, दळणवळण, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि वैज्ञानिक प्रयोगांसाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. भारतीय उपग्रह निर्मिती क्षेत्राला स्वदेशी तंत्रज्ञानाची जोड देत जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.





Comments
Post a Comment