सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!
मा.
प्रताप सरनाईक साहेब,
परिवहनमंत्री
महाराष्ट्र राज्य
यांच्या सेवेसी
साहेब, आम्ही डायव्हरांनी दारू पिऊन बस चालवू नये, तूम्ही आम्हाला ड्युटी सुरु करण्यापुर्वी टेस्ट कंम्पलसरी केली.पण साहेब आम्ही मुळात दारू का पितो,याचा विचार कराल का ?अहो प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो साहेब .अस्या वेळी ज्याचा खांद्यावर बसमधील ३०ते ३५ जणांचे भवितव्य अवलुंबन असते अस्या डायव्हरांना दारू पिऊन स्वत:सह त्यांचा जीव धोक्यात घालायला का वाटतो, याचा विचार कराल का, ?
साहेब, जर कुठे नरक असेलच तर तो इथे आहे,अस्या पद्धतीच्या ठिकाणी आमच्या मुक्कामाची सोय असते.साहेब रेल्वेमध्ये डायव्हरांना रहायला चांगल्या खोल्या असतात,खायला मोफत असते.ड्युटीवर जॉइन होण्याचा आधी त्याची पुरेसी विश्रांती होईल याची काळजी घेतलेली असते.आठवड्याभरात किती तास रेल्वे चालवायची याचे निश्चित नियम आहेत.आमच्या येथे काही हाताच्या बोटावर मोजता येतील,असे अपवाद वगळता चित्र नरकापेक्षा वेगळे नाही हो साहेब.
सकाळी घरुन निघताना डब्यात बांधलेले अन्नच कितीही गार झाले तरी,आम्हाला खावे लागते.ते गरम करण्याची देखील सोय अनेक ठिकाणी नाही.झोपायला जेमतेम जागा मिळते,त्यातच सामानासह अंग टाकायचे आणिदुसऱ्या दिवशी कामावर रुजू व्हायचे.हेच आमचे आयुष्य. आम्ही जिथे आराम करतो,तेथील फॅन हवा कमी देतो आवाजच जास्त करतो. डासांसह अनेक प्रकारचे किटक,आमच्या सभोवताली असतात.साहेब, माता भगिनींचा त्रास तर विचारू नका, त्यांची महिन्याचा त्या विशिष्ट दिवसात फारच कुंचबना होते.
साहेब हे कमी की काय आमचा पगार देखील वेळेवर मिळत नाही.पगार कधी होईल, ज्यामुळे मुला-बाळांचे घरातील इतर सदस्यांचे दुखणे आणि इतर गोष्टीवर खर्च करता येईल,या चिंतेत दिवस काढायचे.
त्यातच बेशिस्त वाहनचालक, अपुरे रस्ते यात मार्ग काढत बस चालवावी लागते.प्रवाश्याची सीट तुटकी असली तर त्याची बातमी होते.मात्र आमच्या सीटस कोणत्या पद्धतीच्या आहेत,याचा देखील विचार करा.त्रासदायक सीटवर बसून बस चालवल्यामुळे कमी अंतरावर देखील थकायला होते.शिवशाही, शिवनेरी सारख्या काही सेवांचा अपवाद सोडून देऊया.नागरिक अनेकदा बस स्टॉप नसताना त्यांच्या घरासमोर गाडी थांबायला सांगतात.गाडी नाही थांबवली तर तक्रार करण्याची धमकी देतात,आणि वरीष्ठ अधिकारी तक्रार आली की,अनेकदा आमची बाजू ऐकुन न घेता आम्हांला तंबी देतात.नादुरुस्त बसेस चालवताना विनाकारण थकायला होते साहेब.यावर देखील काहीतरी करा हो साहेब.
साहेब आमच्यातील काही जण दारु पिऊन स्वत:सह दुसऱ्याचा जीव देखील धोक्यात घालतात.हे चुकीचेच आहे. मात्र साहेब वर सांगितलेल्या गोष्टीमुळे येणारा ताण हलका करायला आमचाकडे दुसरा मार्ग नाहीये ,आम्हाला आमचा ताण दुर करायला मार्ग सुचवा साहेब ,लई उपकार व्हतील साहेब.
साहेब कधी कधी पेपरमध्ये वाचतो अमुक जेलमधील कैद्यांनी गिरवले योगाचे धडे, तमुक जेलमधील कैद्यांनी शिकला प्राणायाम. साहेब एसटीतील सर्व डायव्हर कंडक्टरांसाठी यासरखा उपक्रम हाती घ्या.लईच उपकार व्हतील साहेब.आम्ही प्राणायम, आणि योगा करुन आमच्या ताणला दुर करु मग कश्याची बाटली आणि कश्याच काय !
आपल्याच परिवहन सेवेतील एक डायव्हर!



Comments
Post a Comment