आम्हाला वाहक हवेच!
प्रति
प्रताप सरनाईकजी
परिवहन मंत्री,
महाराष्ट्र राज्य यांच्या सेवेशी
सप्रेम जय महाराष्ट्र
साहेब मी खासगी क्षेत्रात नोकरी करत असलो तरी एसटी बसचा चाहता आहे. मी एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेच्या फायदा घेत महाराष्टाचा कानाकोपरा अनेकदा पालथा घातला आहे. या प्रवाशामध्ये मला सर्वात जास्त मदत झाली असेल तर ती आपल्या एसटी महामंडळाच्या वाहकांची. आपल्या एसटी महामंडळाचे वाहक हे प्रवाशांसाठी अक्षरशः देवदूत असतात. कोणत्या प्रवाशास कुठे उतरायचे आहे? हे लक्षात घेत अचूकपणे त्याविषयी चालकाला सांगणे आणि प्रवासी पूर्ण उतरला आहे याची खात्री करूनच चालकाला बस पुढे नेण्यासाठी सुचना करणे याबाबत वाहक आपले कर्तव्य अचूकपणे पार पाडतात. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. सर्व प्रवाशांनी तिकीटू घेतली आहेत ना ? कोणाचे पैसे देणे बाकी आहे का? तसेच सध्याचा ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या मिश्र जगात पैश्याचे अचुक हिशोब ठेवण्याचे काम आपले वाहक करत असतात. थांबा नसताना देखील कोणत्याही प्रवाश्याने हात दाखवल्यावर त्यास सेवा देण्याचे काम वाहकच करतात
मात्र असे असुन देखील एसटी महामंडळ नफ्यात आणण्यासाठी अनावश्यक खर्चात कपात व्हावी, या हेतूने आपण वाहकांवरील खर्च कमी करण्याचा विचार करत असल्याचे एसटीच्या अधिकृत फेसबुक पेजवरील २सप्टेंबर २०२६ च्या पोस्टद्वारे समजले. एसटी नफ्यात आलीच पाहिजे, यात शंकाच नाही. किमान ना नफा ना तोटा या पातळीवर एसटी आलीच पाहिजे.हे मान्य केले तरी आपण त्यासाठी ज्या गोष्टी करत आहात हे बघून वाईट वाटले.आज देशात आणि राज्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. जर्मन देशाच्या एकुण लोकसंख्येएव्हढा युवा वर्ग आज ना नोकरी व्यवसाय करतोय ना काही शिक्षण घेतोय हे नीती आयोगाने स्पष्ट केलेच आहे.असे असताना वाहकांवरील खर्चात कपात करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न अजून गंभीर होऊ शकतो.तरी आपण या निर्णयाचा पुनर्विचार करवा असी माझी आपणास विनंती आहे.
आपले एसटी महामंडळ तिकीट भाड्यात ५२समाजघटकांना सवलती देते. मी ज्याचा नियमितपणे वापर करतो त्या आवडेल तिथे प्रवास सारख्या योजनांचा समावेश केला तर ही संख्या सहज ६५ ते७० पर्यत पोहोचेल. देशात महाराष्ट्र सोडुन कोणतेही एसटी महामंडळ इतक्या सवलती देत नाहीत.समाज घटकांना देण्यात आलेल्या सवलतींमुळे एसटीचे जे उत्पन बुडते त्याची भरपाई राज्य सरकारकडून देण्यात येत असली तरी त्यामध्ये बराच उशीर होतो, हे आपणास माहिती आहेच. एसटीला राज्य सरकारकडून या बुडालेल्या उत्पनाशिवाय अधिकची मदत आवश्यक असताना बुडीत उत्पनच कसेबसे मिळतेयं,ही वस्तुस्थिती आहे,हे आपण जाणतातचं.
कोणत्याही लोककल्याणकारी राज्यात सर्वसामान्य जनतेचे कल्याण करणे राज्यसरकारचे कर्तव्य आहे.आपले महायुतीचे सरकार यामध्ये पुर्णपणे पास देखील होत आहेत. मात्र एसटी महामंडळाची स्थिती बघता अन्य नागरिकांचे कल्याण करताना एसटीचा वाहक भरडला जाणे चुकीचे नाही का?
तरी माझी आपणास एसटी बसचा एक चाहता म्हणून विनंती आहे की, एसटी महामंडळाकडून देण्यात आलेल्या सवलतींचा फेरविचार करण्यात यावा.अनावश्यक सवलती बंद करुन त्याद्वारे आर्थिक उत्पन वाढवणे. एसटी महामंडळाचे उत्पन वाढवण्यासाठी वाहकांचा बळी देऊ नये.
Comments
Post a Comment