८० तासाला एक
८० तासाला एक हा दर आहे २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाचा. गेल्या वर्षी तब्बल ११० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले.मात्र या ११० चित्रपटांनी किती कमाई केली, याची माहिती घेतली असता समोर येणारे चित्र खुपच विदारक आहे.या मराठी चित्रपटांची एकत्रीत कमाई आहे, फक्त ९९ कोटी रूपये. सरासरी एका चित्रपटाची कमाई येते ९० लाख रूपये. सुमारे १० कोटी मराठी भाषिक असलेल्या महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीचे हे कटू वास्तव आहे. २०२५ वर्षात प्रदर्शित झालेल्या सर्व मराठी चित्रपटांच्या एकत्रीत कमाईला महाराष्ट्राचा लोकसंख्येने भागले असता समोर येणारे चित्र भीषण हा शब्द हास्यास्पद वाटावा असे आहे.महाराष्ट्रातील जनतेने २०२५ वर्षात मराठी चित्रपटावर खर्च केलेली रक्कम आहे तब्बल १० रूपये प्रती व्यक्ती. एक कप चहाच्या किंमती एव्हढी रक्कम खर्च करण्याचे मोठे औदार्य महाराष्ट्रातील मराठी जनतेने दाखवले आहे.
मराठी चित्रपटांनी यावेळी एकत्रीत मिळवलेल्या कमाईला चित्रपटाच्या संख्येने भागले असता चित्रपटाचे जे सरासरी उत्पन मिळते ते आहे ९०लाख रुपये. पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये ६५० ते १३०० स्वेअर फुट कार्पेट एरिया असणारा एक फ्लॅट या किमतीत खरेदी करता येतो. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या कमाईवर एक ३, बीएचके फ्लॅट घेता येतोय.किती मोठी गोष्ट आहे ही.त्यातही अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ९९ कोटी रूपयांचा उत्पनापैकी ७४ कोटी रूपयाचे उत्पन १० चित्रपटांनी केली आहे.उरलेल्या १०० चित्रपटांची कमाई आहे २५ कोटी रूपये .२५ लाख रूपये प्रति चित्रपट.
या अतिशय तुटपुंज्या रक्कमेत चित्रपटाचे तंत्रज्ञ, लेखक, कॅमेरामन, स्पॉटबॉय, ड्रेसमन, मेकअपमॅन आणि कलाकार, वितरक (असले तर) नृत्य दिग्दर्शक, मुख्य दिग्दर्शक देय देण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे,किती हे अचूक आर्थिक नियोजन. नोबेल पुरस्कार मिळावा या दर्ज्याचे.
काही जण म्हणतील या ११० चित्रपटांपैकी काही चित्रपट हे प्रायोगिक स्तरावरचे होते.व्यावसायिक नव्हते.विविध फिल्म महोत्सवात दाखवण्यासाठीच त्यांची निर्मिती करण्यात आली होती. हा मुद्दा मान्य करण्यासारखा आहे. समजा या सारख्या चित्रपटाची संख्या ६० टक्के आहे,असे समजू. तरी ११० चित्रपटांपैकी उरलेल्या ४४ चित्रपटांंची बॉक्स ऑफिसवरील कमाई समाधानकारक म्हणता येणार नाही. १० कोटी मराठी भाषिक ज्या महाराष्ट्रात राहतात, त्या महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीची ही स्थिती उत्तम नाही. भारताच्या चित्रपटसृष्टीचा पाया हा मराठी भाषिक असलेल्या दादासाहेब फाळके यांनी घातला होता,याचा विचार करता हे चित्र बदलायचाच हवे.भले चित्रपटांची संख्या कमी झाली तरी चालेल ८० तासाला एक चित्रपट प्रदर्शित होण्याचा २०२५ चा दर आहे त्याचा ऐवजी १६०,२०० तासांनी चित्रपट प्रदर्शित झाला तरी चालेल. त्यांनी कमाई करायला हवी.
जगाचे अर्थशास्त्र हे मागणी आणि पुरवठा या तत्वावर चालते.त्यामुळे जर मराठी भाषिकांनी मराठी चित्रपटासाठी गर्दी केली तर मल्टिप्लेक्सवाले हिंदी चित्रपट काढून मराठी लोक म्हणतील तेव्हढ्या स्क्रिनवर हव्या त्या वेळी मराठी चित्रपट नक्कीच लावतील. मात्र हे करायलाच हवे.केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे हा मंत्र आपण या निमित्ताने जपायला हवा.
Comments
Post a Comment