अशी झाली मानवाच्या अंतराळ प्रवासाची सुरुवात
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी पृथ्वीवर मानव करत असलेल्या निसर्गाच्या हानीमुळे मानवाला नजीकच्या भविष्यकाळात आपला मुक्काम पृथ्वी सोडून अन्य ग्रहावर किंवा किमान अंतराळ स्थानकावर काढावा लागेल, असे विधान केले होते. तसेच मानवाला आवश्यक असणाऱ्या अनेक धातूंचा साठा पृथ्वीवर तर इतर ग्रहावर मोठ्या प्रमाणात असल्याने तो पृथ्वीवर आणणे सोपे व्हावे, यासाठी अंतराळात मानवाला सहजतेने राहता यावे, यासाठी काय करता येईल? अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणाचा मानवावर काय परिणाम होईल? याचा अभ्यास विसाव्या शतकाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात सुरू झाला. रशियाचे मीर अवकाश स्थानक, अमेरिकेचे स्काय लॅब हे अंतराळ स्थानक असो, किंवा सध्या वापरात असलेले आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक असो, किंवा आता वेगाने आकारास येणारे चीनचे अवकाश स्थानक असो, किंवा भारताकडून अंतराळ स्थानक उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना — हे त्यातीलच काही महत्त्वाचे टप्पे.
मानवाची अंतराळात थेट वस्ती करण्यासाठीच्या उपाययोजना जरी २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या असल्या तरी यामागच्या कल्पनेचा मोठा इतिहास आहे. युरोप खंडाचा विचार करता सतराव्या शतकाच्या सुमारास युरोपमध्ये प्रबोधनाचे युग सुरू झाल्यावर लिहिलेल्या सुरुवातीच्या विज्ञानकथांमध्ये आपणास मानवाचे पृथ्वीबाहेरच्या जीवनाविषयी उल्लेख आढळतो. यात पृथ्वीबाहेर कसे पडता येईल याबाबत विविध अंदाज बांधलेले आढळतात. यातील काही कल्पनांना विज्ञानाचा काही आधार होता, तर काही निव्वळ कवीकल्पना होत्या. मात्र जेव्हा विज्ञानाची मोठ्या प्रमाणात प्रगती होऊन मानवाचे अंतराळात जाण्याचे स्वप्न फक्त स्वप्न न राहता प्रत्यक्षात येऊ शकते, याची जाणीव मानवाला होऊ लागली तेव्हा शास्त्रज्ञांना आपल्या संशोधनाची दिशा ठरवताना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
मानवाच्या अंतराळ प्रवासाविषयी कथाकादंबऱ्यांची यादी करायची झाल्यास त्यात अनेक कथा आणि कादंबऱ्यांचा समावेश करता येऊ शकतो. मात्र त्यातील काही प्रमुख साहित्यकृतीची माहिती करून घ्यायची असल्यास आपण प्रामुख्याने *अ रिंकल इन टाइम*, *पृथ्वीपासून चंद्रापर्यंत*, रशियन शास्त्रज्ञ कॉन्स्टँटिन सिओलकोव्स्की यांनी २०व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या कादंबऱ्या, एच.जी. वेल्सची १९०१ मधील *द फर्स्ट मेन इन द मून* आणि जॉर्ज ग्रिफिथची १९०१ मधील *ए हनीमून इन स्पेस* यांचा विचार करावाच लागतो. रशियन शास्त्रज्ञ कॉन्स्टँटिन सिओलकोव्स्की यांनी २०व्या शतकाच्या सुरुवातीला अंतराळ विज्ञानाचा आणि रॉकेटचा पाया घातला. त्यांनी भविष्यात मानवजात अंतराळ प्रवास कसा करू शकेल यावर आधारित कथा आणि विचार मांडले.
*अ रिंकल इन टाइम* ही मॅडेलीन ल’एंगल यांनी १९६२ मध्ये लिहिलेली तरुण प्रौढांसाठीची कादंबरी आहे. या कथेत ब्रह्मांडातील वाईट शक्तींविरुद्ध लढण्यासाठी अवकाश आणि काळाच्या प्रवासाचा वापर केला जातो. अंतराळ प्रवासावर आधारित सुरुवातीच्या कादंबऱ्यांमध्ये ज्युल्स व्हर्नची १८६५ मधील *पृथ्वीपासून चंद्रापर्यंत* ही चंद्रप्रवासाची प्रमुख संकल्पना मांडणारी पहिली कादंबरी आहे, जी एका तोफेतून चंद्रावर जाणाऱ्या लोकांची कथा सांगते. त्यानंतर एच.जी. वेल्सची १९०१ मधील *द फर्स्ट मेन इन द मून* आणि जॉर्ज ग्रिफिथची १९०१ मधील *ए हनीमून इन स्पेस* यांसारख्या इतर विज्ञानकथा आहेत, ज्या अंतराळ आणि चंद्रावरील प्रवासाचे चित्रण करतात. या सुरुवातीच्या कथा विज्ञानकथांचा पाया घालणाऱ्या ठरल्या, ज्यांनी भविष्यातील अंतराळ प्रवास आणि मानवी अस्तित्वावर प्रश्न विचारले. आजच्या विज्ञान प्रगतीचा पाय या कथांनी घातला.
या विज्ञानकथांमधून प्रेरणा घेऊन अंतराळात जाणारा पहिला सजीव ठरली लाईका नावाची सोव्हिएत कुत्री, जी ३ नोव्हेंबर १९५७ रोजी *स्प्युटनिक* या अंतराळयानातून पृथ्वीभोवती कक्षेत गेली होती. आणि मानवाच्या अंतराळ मोहिमेच्या प्रवासाला सुरुवात झाली. दुर्दैवाने जिवंतपणी पृथ्वीबाहेर गेलेली ही कुत्री पृथ्वीवर पुन्हा जिवंत परतू शकली नाही. मात्र मानवाला आपण पृथ्वीबाहेर सजीव पाठवू शकतो याची जाणीव झाली. शीतयुद्धाच्या काळात त्यावेळच्या दोन महासत्ता — अमेरिका आणि यूएसएसआर — यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नातून सुरू झालेली अवकाश संशोधन स्पर्धा अखेर फायदेशीर ठरली. याच स्पर्धेतून पृथ्वीबाहेर जाणारा पहिला मानव ठरला यूएसएसआरचा युरी गगारिन. त्याने *वोस्तोक १* या अंतराळयानातून पृथ्वीबाहेर पाऊल ठेवले. युरी गगारिन यांनी १०८ मिनिटे अवकाशात घालवली. मात्र या पावणे दोन तासांच्या कालावधीमुळे मानव आकाशात जाऊ शकतो आणि सुरक्षितपणे पृथ्वीवर परतू शकतो ही जाणीव मानवाला झाली. १२ एप्रिल १९६१ ला मिळालेल्या या यशामुळे प्राप्त झालेल्या आत्मविश्वासावर सर्व मानवजातीच्या अंतराळ प्रवासाची सुरुवात झाली.
यानंतर मानवाच्या अंतराळ प्रवासाची वाटचाल अत्यंत वेगाने झाली. फक्त दहा वर्षांत म्हणजेच १९७१ एप्रिल १९ ला जगातील पहिले अंतराळ स्थानक अस्तित्वात आले. सोव्हिएत युनियनने उभारलेले *सॅल्यूत १* हे अंतराळ स्थानक उभारण्यात आले. यानंतर सोव्हिएत युनियनकडून *मीर* आणि अमेरिकेकडून *स्कायलॅब* ही अंतराळ स्थानके उभारण्यात आली. मात्र यातूनच अंतराळ हे सर्व मानवासाठी खुले आहे — पृथ्वीवरील हेवेदावे पृथ्वीवरच ठेवूया; ते अंतराळात न्यायचे नाहीत. येथील संशोधन कोण्या एकाची मक्तेदारी नाही, हा विचार पुढे आला. आपण सध्या साजरा करत असलेला जागतिक अंतराळ सप्ताह हा याच विचाराचा परिणाम आहे. याच कल्पनेतून १५ नोव्हेंबर १९९८ साली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अस्तित्वात आले आणि मानवी ऐक्याचा नवा अध्याय सुरू झाला. मात्र आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मर्यादा लक्षात घेऊन स्वतःच्या विकासासाठी भारत आणि चीन यांसारखे देश स्वतःची अंतराळ स्थानके उभारण्यासाठी पुढे येत आहेत.
लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केलेल्या विधानाप्रमाणे, जर पृथ्वीवर राहणे अशक्य झाले तरी सध्याचे मानवाचे अंतराळात राहणे हे आज ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रायोगिक स्तरावर आहे. आपण पृथ्वीवर ज्या सहजतेने राहतो, तितक्या सहजतेने मात्र अंतराळात राहू शकणार नाही. आणि संख्येनेही कमीच लोक अंतराळात राहू शकणार आहेत. तरी जरी आपले अंतराळात राहण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत असले तरी पृथ्वीचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.
(पुर्वप्रसिद्धी गेली ४० वर्ष मुंबई आणि नाशिक येथे खगोलशास्त्राचा प्रचार प्रसार करणारी संस्था खगोल मंडळाचे नियतकालीन 'खगोलविश्व च्या ऑक्टोबर- २०२५ च्या अंकात)
Comments
Post a Comment