खगोलातील अढळ तारा निखळला
खगोलशास्त्रप्रेमींची मंगळवार 20 मेची सकाळ उजाडली,ती एका दुर्देवी बातमीने. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाच्या बातमीने खगोलशास्त्रप्रेमींना त्यातही मराठी जनांना आपल्यातीलच कोणीतरी भावना दाटून आली.
जगविख्यात शास्त्रज्ञ असून देखील आलेल्या पत्रांना आवर्जून उत्तर देणारे व्यक्तीमत्व म्हणून डॉ. नारळीकर विख्यात होते.डॉ. नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. पालकांच्या या ज्ञानाचा प्रभाव बालपणी डॉ जयंत नारळीकरांवर पडला.नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे ह्यांच्याशी झाला. त्यांचा सुविद्य पत्नी कै मंगला नारळीकर या गणितज्ञ होत्या. दोन वर्षापुर्वी जूलै 2023 रोजी त्यांचे निधन झाले.
१९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘स्थिर विश्व सिद्धांत मांडला चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू होते ज्याला आता पुर्णविराम मिळाला आहे.
आपल्या पृथ्वीबाहेर जीवसृष्टी आहे का, हे शोधण्यासाठी नासातर्फे 80च्या दशकात व्हायजर 1 आणि व्हायजर 2 ही दोन याने पाठवण्यात आली होती.ज्यात पृथ्वीवरील सजीव सृष्टीची माहिती देणाऱ्या क्लिप समाविष्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये वापरण्यात आलेल्या आवाजांमध्ये डॉ.जयंत नारळीकरांचा देखील आवाज वापरण्यात आला होता. त्यांनी मराठी आणि संस्कृत मध्ये आवज दिला होता.
त्याच बरोबर सतत पुस्तके सुद्धा डॉ जयंत नारळीकर लिहीत. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले . यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग त्यांनी केला. त्यांची यक्षाची देणगी हा कथा संग्रह, वामन परत न आला, प्रेषित, व्हायरस या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांचा नाशिकशी विशेष ऋणांनुबंध होता. नाशिकच्या वसंत व्याखानमालेत त्यांनी व्याख्यान दिले होते. नाशिक येथे झालेल्या 94व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.यावेळी मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी करावयाच्या सुचना विशेष गाजल्या होत्या .तसेच मुंबई, आणि नाशिक येथे कार्य करणाऱ्या खगोल मंडळ या संस्थेच्या मार्फत सुद्धा नाशिककर डॉ जयंत नारळीकर यांच्याशी जोडले गेले होते.
त्यांच्या निधनाने आपण सर्वसामान्यात मिसळणारा जागतिक किर्तीचा खगोलशास्त्रज्ञ आपण गमावला आहे.
Comments
Post a Comment