भारताची बुद्धिबळातील यशाची चढती कमान
सुपर ग्रँडमास्टर डी.गुकेशने विश्वविजेतेपदाला गवसणी घालून समस्त भारतीयांना आनंदाची अनुभती देवून आठवड्याचा कालावधी पुर्ण होतो ना होतो, तोच भारताने बुद्धिबळाच्या बाबत अजून एक यश मिळवले आहे.भारताचे हे यश आहे, 'आशियाई शालेय बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये'
बँकॉक येथे १डिसेंबर ते ११डिसेंबर या दरम्यान झालेल्या, आशियाई शालेय बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये' भारताने १८सांघिक आणि १५ वैयक्तिक पदके मिळवत तिसरा क्रमांक मिळवला आहे.सांघिकरीत्या मिळवलेल्या १८पदकांमध्ये ३ सुवर्ण, १०रौप्य आणि ५ कांस्य पदके आहेत तर वैयक्तिकरीत्या मिळवलेल्या १५पदकांमध्ये ४सुवर्ण २रौप्य आणि ९ कांस्य पदके मिळवली आहेत. दिवी बिजेशने क्लासिकल आणि ब्लिट्झ या दोन्ही प्रकारात उत्तम कामगिरी करत दुहेरी सुवर्ण पदक जिंकले.तिने स्विस लीग पद्धतीने खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत सर्वच्या सर्व सामने जिंकले. तीने रॅपिड अंडर-9 मुलींच्या गटात कांस्य पदक सुद्धा मिळवले. नरेंद्र अग्रवालने ब्लिट्झ अंडर-11 ओपनमध्ये सुवर्ण आणि रॅपिडमध्ये कांस्यपदक जिंकले. वेदिका पाल हिने 11 वर्षांखालीलमुलींमध्ये सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारतातर्फे सहभागी झालेल्या 10 खेळाडुंपैकी प्रत्येकाने किमान एक पदक जिंकले आहे. श्री एस ने १३ वर्षांखालील मुलींमध्ये रौप्य आणि कांस्यपदक मिळवले. दर्शवी राय ने ७ वर्षांखालील मुलींमध्ये रौप्यपदक मिळवले. आरण्या आर ने ७ वर्षांखालील मुलींमध्ये दुहेरी कांस्यपदक जिंकले. महिला मुख्य प्रशिक्षक आराध्या दास, वीरभद्रसिंह गढवी, ओशिक मोंडल आणि महिला मुख्य प्रशिक्षक भिल्ल्वा निलया कोंडारी ईश्वरा कृष्णा यांनी अनुक्रमे ११ वर्षांखालील मुली, १७ वर्षांखालील मुली, ९ वर्षांखालील मुली आणि १७ वर्षांखालील मुलींमध्ये प्रत्येकी कांस्यपदक मिळवले.
या यशामुळे, फक्त ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद, ग्रँडमास्टर आर वैशाली, ग्रँडमास्टर अर्जुन ऐरिगसी, हेच ग्रँडमास्टर डी गुकेशचे वारसदार नाहीत तर गुकेशची यशाची परंपरा पुढे नेण्यासाठीची दुसरी ,तिसरी, चौथी फळी सुद्धा वेगाने तयार होत असल्याचे स्पष्ट होत आहे.जे बघुन कोणत्याही भारतीयाची मान आनंदाने ताठच होईल.एकेकाळी रशिया आणि अमेरीकेची मक्तेदारी असलेल्या मात्र भारतीयांनी शोधलेल्या, बुद्धिबळ या खेळात त्यांचे वर्चस्व मोडीत काढत, भारत वेगाने पुढे जात आहे,आशियाई शालेय बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये मिळालेले हे यश, त्याचेच एक स्वरूप म्हणून बघायला हवे.आमच्याकडे फक्त डी गुकेशच नव्हे तर गुकेशचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या खेळाडुंची मोठी फळी असल्याचा संदेश जगाला यातून गेला आहे.जो भारताचा गौरव जगात वाढवणारा आहे, हे नक्कीच..!


Comments
Post a Comment